इंदूर पोलिसांचीच वेबसाईट हॅक

ॲडिशनल एसपी आणि झोन २ च्या सर्व अधिकाऱ्यांच्या नावापुढे ‘हॅक्ड बाय मोहम्मद बिलाल’ असे लिहिले

इंदूर : पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक झाली आहे. हॅकरने डीजीपीनंतर ॲडिशनल एसपी आणि झोन २ च्या सर्व अधिकाऱ्यांच्या नावापुढे ‘हॅक्ड बाय मोहम्मद बिलाल’ असे लिहिले. तसेच आक्षेपार्ह बोर्डही झळकावले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केली. हॅकरने केलेल्या या खोडसळपणामुळे खळबळ उडाली आहे.

याआधी सोमवारी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी संपूर्ण राज्यात रेड अलर्ट जारी केली होता. यानंतरही हॅकरने पोलिसांची वेबसाईट हॅक केली. हॅकिंगच्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून सायबर टीम सक्रीय झाली आहे. वेबसाईट रिकव्हर करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

दरम्यान, पाकिस्तानी हॅकर मोहम्मद बिलाल याने भारतातील वेबसाईट हॅक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या हॅकरने याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये दिल्ली भाजपाची वेबसाईट हॅक केली होती. एप्रिल २०१८ ला आंध्र विद्यापीठाची वेबसाईटही बिलालने हॅक केली होती. तसेच १५ ऑक्टोबर, २०१८ ला गोवा भाजपची वेबसाईट हॅक केली होती.

दरम्यान, क्राईम ब्रांचचे ॲडिशनल एसपी गुरू पाराशर यांनी वेबसाईट रिकव्हर करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. ज्या आयपी ॲड्रेसद्वारे वेबसाईट हॅक करण्यात आली तो ट्रॅक करण्याचे काम सुरू असून सध्या वेबसाईट ब्लॉक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here