पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज : नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
रत्नागिरी : जिल्ह्यात १६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवतानाच हवामान विभागानं आजसाठीही रेड अलर्ट जारी केला आहे. सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने जिल्ह्याला झोडपले. भारजा, जगबुडी, वाशिष्ठी, बावनदी, काजळीसह अर्जुना नद्यांनी पाणी पातळी ओलांडली असल्यानं किनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
संगमेश्वर व लांजा परिसरात अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. राजापूर शहरातही पुन्हा पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर वाढत असल्यानं राजापूरमधील अर्जुना व कोदवली या नद्यांना पुन्हा पूर आला आहे. मुख्य चौक असलेल्या जवाहर चौकाला पाण्याचा वेढा बसला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. पोलीस, नगरपरिषद प्रशासन २४ तास सतर्क झाले असून परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी १३०.२६ मि.मी. पाऊस झाला. त्यात मंडणगड २१५.१०, दापोली ९४.३०, खेड ४६.५०, गुहागर १३५.६०, चिपळूण १०२.५०, संगमेश्वर १४५, रत्नागिरी १६२.९०, राजापूर १२८.७०, लांजा १४१.७० मि.मी. नोंद झाली.






