ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : डोंबिवली रेल्वे स्थानकानजिक असलेल्या लक्ष्मीनिवास इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गोदाम असून या गोदामापासूनच आगीला सुरुवात झाली असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान अग्निशमन दल आगीच्या ठिकाणी पोहचले असून, आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकजवळ, मे. कामत मेडिकल समोर, डोंबिवली ( पू.) येथील लक्ष्मी निवास या इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. आगीची तीव्रता जास्त असल्याने संपूर्ण परिसरात आगीचे लोळ पसरलेले दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दुपारी २:५५ वाजताच्या सुमारास आग लागली असल्याचे म्हटले जात आहे.
घटनास्थळी डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान, २-फायर वाहन व ३-वॉटर टँकर तसेच एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहनासह उपस्थित आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत जिवीतहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.






