पंजाब काँग्रेसचा तिढा सुटला; अमरिंदरच मुख्यमंत्री, सिध्दू प्रदेशाध्यक्ष

चंदीगड : पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलहावर तोडगा निघाल्याचे संकेत काँग्रेस नेते हरीश रावत यांनी दिले आहेत. पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी कॅप्टन अमरिंदर सिंह, तर नाराज नवजोत सिंह सिद्धू यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. तसेच दोन वर्कींग प्रेसिडेट बनवले जाणार आहेत. ते हिंदू आणि दलित समुदायातील असतील असं सांगण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल असंही हरीश रावत यांनी सांगितलं.



गेल्या काही दिवसात पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. २०२२ विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेटही घेतली होती. मात्र दरम्यानच्या काळात यावर तोडगा निघत नसल्याचं दिसताच नवजोत सिंह सिद्धू नाराज झाले होते. तसेच आम आदमी पक्षात जाणार याबाबच्या बातम्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या.



सुनील जाखड हे सध्या पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे नवजोत सिंह सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या भांडणात त्यांचं पद जाणार आहे. पंजाबमधील वादावर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी बुधवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव केसी वेणुगोपाळ, महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि प्रदेश प्रभारी हरीश रावत उपस्थित होते. यावेळी या वादावर हा तोडगा सुचवण्यात आल्याचं बोललं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here