प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे हृदयविकाराने निधन

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : हिंदी चित्रपटसृष्टीतील समांतर सिनेमातून नावलौकिक मिळविणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या होत्या.

त्यांच्या निधनाविषयी त्यांच्या मॅनेजरने सिनेजगताला कळवितांना सांगितले की, ‘तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या सुरेखा सिक्री यांचं शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. दोनदा ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असंही मॅनेजरनी म्हटलंय.

‘किस्सा कुर्सी का’ पासून सुरेखा सिक्रींनी १९७८ मध्ये कारकीर्दीला सुरुवात केली. तमस (१९८८), मम्मो (१९९५) आणि बधाई हो (२०१८) साठी त्यांना सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. २०१९ साली उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते सुरेखा सिक्रींनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला होता. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या अमित शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’ या सिनेमातल्या त्यांच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला होता.

कलर्स टीव्हीवरील बालिका वधू या दीर्घकाळ चाललेल्या मालिकेतली सिक्रींची दादीसाची भूमिकाही गाजली होती. २००८ ते २०१६ दरम्यान सुरू असलेली ही मालिका तामिळ, तेलुगू आणि मल्याळमसह इतर अनेक भाषांत डब करण्यात आली आणि सिक्रींची लोकप्रियता भारतभर पसरली.

गोविंद निहलानींची दूरदर्शन मालिका ‘तमस’ (१९८८). याचं नंतर फिल्ममध्ये रूपांतर करण्यात आलं. आणि श्याम बेनेगल यांचा ‘मम्मो’ (१९९४) हा सिनेमा. या दोन्ही सिनेमांसाठी व ‘बधाई हो’ या चित्रपटातील सहाय्यक भूमिकेसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला होता. पण सहाय्यक भूमिका म्हटल्याने या भूमिकांचं महत्त्वं कमी होत नाही. इतर अनेक अभिनेत्यांप्रमाणेच सुरेखा सिक्री रंगभूमीच्या मार्गे मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचल्या. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या १९७१ च्या बॅचच्या त्या विद्यार्थिनी.

७० ते ९० च्या दशकातल्या अनेक समांतर सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला. १९७८ मध्ये आलेला अमृत नहाटांचा ‘किस्सा कुर्सी का’ सिनेमा हा इंदिरा गांधींवर आधारित असल्याचं म्हटलं गेलं आणि आणीबाणीच्या काळात म्हणजे १९७५-१९७७ दरम्यान यावर संजय गांधींनी बंदी घातली होती.

सुरेखा सिक्रींनी अनेक मोठ्या फिल्म निर्मात्यांसोबत काम केलं. श्याम बेनेगल यांच्यासोबत त्यांनी मम्मोसोबतच ‘सरदारी बेगम'(१९९६), ‘हरिभरी’ (२०००) आणि झुबैदा (२००१) या सिनेमांत काम केलं.यासोबतच सईद मिर्झांसोबत ‘सलीम लंगडे पे मत रो’ (१९८९) आणि नसीम (१९९५) आणि अपर्णा सेन यांच्यासोबत ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’ (२००३) सिनेमात त्या होत्या.पण नंतर त्यांनी लहान पडद्यावर जास्त भूमिका केल्या. टीव्हीच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून, ९०च्या दशकापासून त्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका करत होत्या. ‘बनेगी अपेनी बात’मध्ये त्या तरुण मुलींच्या आई होत्या, तर ‘जस्ट मोहब्बत’मध्ये त्यांनी चष्मा लावणाऱ्या मिसेस पंडित या शाळेच्या मुख्याध्यापिकेची भूमिका केली होती. युरिडिस, द ट्रोजन विमेन, अंतोन चेखॉवचं द चेरी आर्केड, जॉन ऑसबोर्नचं लुक बॅक इन अँगर या नाटकांत त्यांनी भूमिका केली. 1989मध्ये त्यांनी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

गेल्यावर्षी महाबळेश्वरमध्ये शूट करत असताना त्यांना ब्रेन स्ट्रोक आला आणि यानंतर त्यांचा वावर कमी झाला. यामुळेच त्यांना अनेक ऑफर्स नाकाराव्या लागल्या.आणखी एकदा ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.अमोल गुप्तेंचा ‘स्निफ’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा. झोया अख्तरच्या नेटफ्लिक्सवरील हॉरर घोस्ट सीरिजमध्येही त्यांनी भूमिका केली.आजारपणातही त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि डोळ्यांतली चमक कायम होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here