अँटी सबरमीन ‘रोमियो’ हेलिकॉप्टर नौदलात दाखल

सॅन दिएगो : अमेरिकेच्या नौदलाकडून सॅन दिएगो येथे नॉर्थ आयलंडवरील नौदलाच्या तळावर भारतीय नौदलाने ‘MH-60R’ (रोमियो) या बहुकार्यप्रवण असलेल्या दोन हेलिकॉप्टरची पहिली तुकडी समारंभपूर्वक स्वीकारली. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी नौदलाच्यावतीने ही हेलिकॉप्टर्स स्वीकारली.

या हेलिकॉप्टरमध्ये विविध प्रकारची भारतीय बनावटीची शस्त्रे बसवण्यासाठी सुधारणा देखील करण्यात येणार आहे. MH-60r या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या त्रिमितीय क्षमतेत आणखी वाढ होणार आहे. या हेलिकॉप्टरचा त्यांच्या क्षमतेनुसार वापर करता यावा यासाठी कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे सध्या अमेरिकेत प्रशिक्षण सुरू आहे.

MH-60R या हेलिकॉप्टरचा सर्वाधिक वेग २६७ किलोमीटर प्रति तास आहे. हे हेलिकॉप्टर एकाचवेळी ८३४ किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. तसेच याचे वजन ६ हजार ८९५ किलो असून याची क्षमता १० हजार ६५९ किलो वजन नेण्याची आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, डेन्मार्क, सौदी अरब यांच्याकडेही हे हेलिकॉप्टर आहे.

सॅन दिएगो येथे नॉर्थ आयलंडवरील नौदलाच्या तळावर एका समारंभात अमेरिकी नौदलाच्या हवाई दलाचे कमांडर वाईस ऍडमिरल केनेथ व्हिटसेल यांनी या हेलिकॉप्टरची कागदपत्रे भारतीय नौदलाचे उपनौदलप्रमुख वाईस ॲडमिरल रवनीत सिंग यांच्याकडे सुपूर्द केली. MH-60R या हेलिकॉप्टर्सचे उत्पादन लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन या अमेरिकी कंपनीने केले असून सर्व प्रकारच्या हवामानात विविध प्रकारच्या मोहिमांमध्ये काम करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक एवियॉनिक्स/सेन्सर्सचा वापर करून त्यांची रचना करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या २४ हेलिकॉप्टर्सची खरेदी अमेरिकेकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here