नागपूर (प्रतिनिधी) : येथील बेलतरोडी पोलीस ठाण्याजवळ आज (दि.१०) च्या सुमारास सर्व्हीस रिव्हॉल्वरची लॉक झालेली मॅक्झिन फिट करताना ट्रिगर दाबला गेला आणि रिव्हॉल्वरची गोळी नायक पोलीस शिपायाच्या मांडीतून आरपार बाहेर निघाल्याने तो गंभीर जखमी झाला. शेषकुमार देवीदास इंगळे (३५) असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
बेलतरोडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायी व्यंकट गंथाळे (चार्ली) याची शुक्रवारी नाईट ड्युटी होती. ती संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या जवळची सर्व्हीस रिव्हॉल्वर पोलीस ठाण्यात जमा करण्यापूर्वी मॅक्झिन बाहेर काढून साफ केली. मात्र त्यानंतर वारंवार प्रयत्न करूनही मॅक्झिन लागत नसल्याने, त्यांनी नाईट ड्युटीवरच असलेले नायक शिपाई इंगळे यांना फोन केला. इंगळे यांनी रिव्हॉल्वर हातात घेऊन तिचे लॉक उघडून मॅक्झिन फिट करत असताना अचानक रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली. ती इंगळेच्या मांडीतून आरपार बाहेर पडली.
इंगळे रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले. गोळीच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. बाजुलाच पोलीस ठाणे असल्याने ठाण्यातील मंडळी धावली. त्यांनी इंगळेंना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती कळताच अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी ठाणेदार विजय आकोत यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर गंथाळेचा जबाब नोंदवून घेण्यात आला. माहिती कळताच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनीही रुग्णालयात जाऊन इंगळेची भेट घेतली.






