जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : सातत्याने गुन्हेगारीबाबत चर्चेत असणाऱ्या भुसावळ शहरातील एका तरुणाचा रात्री खून झाला असल्याची घटना समोर आली आहे. त्याच्यावर आधी चाकूने वार करून नंतर दगडाने चेहरा ठेचून अत्यंत क्रूरपणे ही हत्या झाली आहे.
याबाबत समजलेले वृत्त असे की, शहरातील जामनेर रोडवर श्रध्दा कॉलनीतील गजानन मंदिराच्या समोर मध्यरात्रीनंतर तरुणावर चाकूने वार करून त्याचा खून करण्याची घटना घडली. या तरुणाचा चेहरा दगडाने ठेचला आहे. मयत तरुणाचे वय ३० ते ३५ दरम्यान असल्याचे दिसून येत आहे. पहाटे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मयताचा चेहरा दगडाने ठेचल्याने त्याची ओळख पटविण्यात अडचणी येत आहे. एकंदरीत प्रकारावरून पूर्ववैमनस्यातून हा खून घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.






