पुण्यात बैलगाडी शर्यत लावणे भोवले, १२ जणांना अटक

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही शनिवारी पुणे शहरातील गुजरवाडीत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आरोपींनी शासकीय आदेशाचा भंग करून गुजरवाडीत बैलगाडी शर्यतीकरिता जमाव जमवला होता. बेकायदेशीरपणे बैलांची शर्यत आयोजित करून बैलांना गाडयांना जोडून त्यांना मारहाण केली. त्यांच्या शेपटया पिरगळून जबरदस्तीने आरडाओरडा करत पळवून निर्दयी वागणूक दिली.

उच्च न्यायालयासह राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातलेली असतानाही पुणे शहरातील गुजरवाडीत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी १२ जणांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बैलगाडी शर्यतीसाठी राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या पंढरीनाथ फडके यांचाही समावेश आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संतोष अशोक ननवरे (रा.कोंढवा), योगेश बाळासाहेब रेणुसे, मयूर दिलीप शेवाळे, पंढरीनाथ जगन फडके, हरिश्चंद्र भागा फडके, पद्माकर रामदास फडके, ऋषिकेश सूर्यकांत कांचन, संकेत शशिकांत चोरगे, यश राजू भिलारे, संतोष शिवराम कुडले, राहुल प्रकाश चौधरी यांना अटक केली आहे. पोलीस हवालदार रविंद्र चिप्पा यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा शर्यतीचे आयोजक आणि सहभागी होणाऱ्यांना बैलांची शर्यत लावणे बेकायदेशीर असल्याचे सांगत होते. तरीही आरोपींनी त्यांच्यासोबत वादविवाद करून धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा करून शर्यतीमधील एक बैल आणि एक छकडा पळवून लावले. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांनी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशातील अटींचे पालन आरोपींनी केले नाही. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here