नागपूर (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या काटोल नरखेड तालुक्यातील वडाळी वडाविहिरा इथे अनिल देशमुख यांची वडिलोपार्जित काही जागा आहे, घरं आहेत, यावर अधिकाऱ्यांनी छापे टाकले असून इथे सर्च मोहीम सुरू आहे. यामध्ये काय माहिती समोर येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या छाप्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाल्याचं दिसत आहे. आता काय माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
दरम्यान, ईडीने अनिल देशमुख यांना तीन समन्स पाठवले होते. परंतु ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. नंतर त्यांनी कायदेशीर संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याची सुनावणी अद्यापही बाकी आहे. ईडीने देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश आणि पत्नीलाही समन्स बजावले होते. हे दोघेही तपास यंत्रणेसमोर आले नव्हते.
याआधीही अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाची ४.२० कोटींची मालमत्ता जोडण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्याविरूद्ध ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या संपत्तीत मुंबईतील सुमारे सव्वा कोटी रुपयांचा फ्लॅट आणि रायगडमधील अडीच कोटी रुपयांच्या जमिनीचा समावेश आहे.






