मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : काल (दि.१७) मध्यरात्रीपासून मुंबई व उपनगरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसानेआता कुठे उसंत घेतल्याचं दिसून येतंय. या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. सध्या विशेष एक्सप्रेस धावत असलेल्या गाड्या रद्द किंवा आंशिक रद्द करण्यात आल्या आहेत
सकाळी कल्याण ते मुंबई दरम्यान रेल्वे सेवा ठप्प होती, त्यामुळे अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या होत्या. आज धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या दक्षिण विभागातील पालघाट इथल्या पडिल ते कुलखेकर दरम्यान माती रूळावर आल्याने लांब पल्ल्याच्या दोन ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये ०६१६३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचिवेल्ली या पंधरावड्यातून एकदा धावणाऱ्या ट्रेनचा समावेश आहे. शिवाय, ०६३४५ लोकमान्य टिळक ते तिरूवनंतपुरम या गाडीचा समावेश आहे.
रद्द झालेल्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक ०१०२७ दादर- पंढरपूर विशेष एक्सप्रेस, गाडी क्रमांक ०२२०७ मुंबई-लातूर विशेष एक्सप्रेस, गाडी क्रमांक ०११३९ मुंबई गदग विशेष एक्सप्रेस यांचा समावेश आहे तर गाडी क्रमांक ०२७०२ मुंबई- हैदराबाद विशेष एक्सप्रेस ही गाडी मुंबई स्थानकाऐवजी ठाणे स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेवर सुटेल. गाडी क्रमांक ०२७०२ हैद्राबाद-मुंबई विशेष एक्सप्रेस ठाणे स्थानकापर्यंत धावेल आणि सदर गाडी, गाडी क्रमांक ०७०३१ मुंबई हैदराबाद विशेष एक्सप्रेस म्हणून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल.
या गाड्या रद्द झाल्याचे किंवा स्थानकात बदल झाल्याचे लक्षात घेऊन प्रवाश्यांनी रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे असं आवाहन वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक जनसंपर्क अधिकारी, सोलापूर मध्य रेल्वे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, या पावसाचा परिणाम हा रस्ते वाहतुकीवरही झाला आहे. मुसळधार पावसाने भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली असून त्यामुळे कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. करूळ घाटातही रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी २६ जुलै पर्यंत यापूर्वीच बंद करण्यात आला आहे.






