मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांना बारमालकांकडून पैसे वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्यानंतर सीबीआय व ईडीच्या रडारवर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या ‘नॉट रिचेबल’ आहेत. ईडीनं ४ कोटींची मालमत्ता जप्त केल्यानंतर देशमुख यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ते नॉट रिचेबल झाल्याचं समजतं.
चौकशीसाठी ईडीनं याआधी देशमुख यांना तीनदा समन्स बजावलं होतं. मात्र, ते एकदाही ईडीपुढं हजर झाले नाहीत. कधी कोरोना तर कधी प्रश्नावलीची मागणी करत त्यांनी चौकशीला जाणं टाळलं. आपल्यावरील कारवाई राजकीय सूडबुद्धीनं होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती.
या प्रकरणात न्यायालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सीबीआयच्या तपासाच्या आधारे नंतर यात ‘ईडी’नंही लक्ष घातलं. ‘ईडी’नं मनी लॉंडरिंग प्रकरणी देशमुख यांच्या नागपूर व मुंबईतील निवासस्थानावर छापे घातले. देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांनाही अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी ईडीनं पुढील कारवाई करत देशमुख यांची ४.२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर काल पुन्हा एकदा देशमुख यांच्या काटोल येथील निवासस्थानी व अन्य काही संशयित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते.






