सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : मंगळवार, २० जुलै रोजी पंढरपूरच्या आषाढी वारीचा सोहळा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची वारी प्रातिनिधिक स्वरुपात साजरी केली जाणार आहे.आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला संत ज्ञानेश्वरांची पालखी निवडक वारकऱ्यांसह एसटीने वाखरी (पंढरपूर) येथे दाखल झाली आहे.
मानाच्या १० पालख्यांमधील ४०० भाविकांना या सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे.राज्यभरातून एसटी बसने निघालेल्या मानच्या पालख्या सोहळा आज (१९ जुलै) सायंकाळी वाखरी (पंढरपूर) पालखी तळावर दाखल झाल्या.
प्रथेप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहपत्नीक महापूजा करणार आहेत. ते आज रात्री उशिरा पंढरपूरमध्ये दाखल होतील.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनानं पंढरपूर व शहरालगत असलेल्या १० गावांमध्ये १८ ते २४ जुलै या दरम्यान संचारबंदी लागू केली आहे.शहरात ३००० हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. १८ ते २४ जुलै दरम्यान कोणालाही पंढरपूर शहरात प्रवेश दिला जाणार नाही, शहराची चोख नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदीमुळे नेहमी गजबजणारे चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर आणि शहरातील प्रमुख रस्ते वारकऱ्यांविना ओस पडले आहेत. शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे.






