मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची सपत्नीक महापूजा

पंढरपूर (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. त्यांच्यासोबत यंदा मानाचे वारकरी म्हणून कोलते दाप्त्यांना मान मिळाला. कोरोनामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक मिटवू दे, वारकऱ्यांनी तुडूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला होता. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यंदा मानाचा वारकरी म्हणून विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांना मान मिळाला. केशव कोलते हे वर्धा येथील रहिवासी असून १९७२ पासून महिन्याची वारी करतात.

कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने विठ्ठल मंदिर बंद आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने विठुरायाच्या अतिशय आकर्षक ३१ प्रकारच्या प्रतिमा तयार करून घेतल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठुरायाच्या अतिशय आकर्षक ३१ प्रकारच्या वॉटरप्रूफ प्रतिमांचा अनावरण सोहळा पार पडला. लॉकडाऊन लांबला तर विठ्ठल भक्तांना या प्रतिमा ऑनलाईन विक्री करण्याची तयारीही मंदिर समितीने ठेवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here