टोकियो : क्रीडास्पर्धांचा महाकुंभ म्हणजे ऑलिंम्पिक स्पर्धा म्हटल्या जातात. २३ जुलैला टोकियो येथे या स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे. मात्र टोकियोमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे ऑलिम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी स्थगित करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने प्रेक्षकांविना स्पर्धा घेण्याचा निर्णय आयोजकांनी यापूर्वीच घेतला आहे.पण दोन जुलैनंतर ऑलिम्पिकशी संबंधित ५८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाबाधितांची वाढती संख्या आयोजकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. खेळाडूंचे वास्तव्य असलेल्या क्रीडाग्राममध्येही कोरोनाने शिरकाव केला असून, खेळाडूंनाच कोरोनाची लागण झाली आहे. साहजिकच खेळाडू सुरक्षित राहतील, हा दावा फोल ठरला आहे. त्यातच ऑलिम्पिकला विरोध कायम आहे. ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी निदर्शनेही केली जात आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक अजूनही रद्द होऊ शकते का, या प्रश्नावर तोशिरो मुटो म्हणाले, की, आम्ही कोरोनाबाधितांच्या आकड्यांवर लक्ष ठेवून आहोत. कोरोनाबाधितांच्या आकड्याबाबत आपण भाकीत करू शकत नाही. वेळ पडली तर आम्ही पाचपक्षीय चर्चा करू शकतो. कोरोनाची प्रकरणे वाढतील किंवा कमीही होतील. आम्हाला परिस्थिती बिघडली तर काय करायला हवे, याचा विचार करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर अखेरच्या क्षणाला ऑलिम्पिक रद्द होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.






