जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

बलासोर (ओडिशा) : बहुपयोगी रडार, कमांड कंट्रोल अँड कम्युनिकेशन सिस्टीम आणि लाँचरसह सज्ज असलेल्या नव्या जनरेशनच्या आकाश या क्षेपणास्त्राची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था- डीआरडीओने आज (दि.२१) दुपारी ओडिशाच्या बलासोर या समुद्रकिनाऱ्यावरील एकात्मिक चाचणी केंद्रावरून यशस्वी चाचणी केली.

ही क्षेपणास्त्र प्रणाली, हैदराबाद येथील संरक्षण, संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने डीआरडीओ सह विकसित केली आहे. आज झालेल्या चाचणीच्या वेळी, भारतीय हवाई दलाचे अधिकारी उपस्थित होते. फ्लाईट डेटा संकलित करण्यासाठी इलेक्ट्रो ऑप्टीकल ट्रॅकिंग सिस्टिम, रडार आणि टेलिमेट्री सारखे अनेक रेंज स्टेशन्स तैनात करण्यात आले होते. या संपूर्ण क्षेपणास्त्र प्रणालीची कामगिरी अत्यंत अचूक होती, असे संकलित झालेल्या डेटा वरुन स्पष्ट झाले आहे. या चाचणीदरम्यान, शत्रूच्यां हवेतील हल्ल्याला हवेतच निष्प्रभ करण्याची गतिमानता या क्षेपणास्त्रात असल्याचेही सिध्द झाले आहे.

भारतीय हवाई दलात समाविष्ट झाल्यावर, आकाश-एनजी प्रणाली भारतीय संरक्षण व्यवस्थेची क्षमता कित्येक पटीने वाढवणारी ठरेल. भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड आणि भारत डायनामिक्स लिमिटेड या उत्पादक संस्थांही या चाचणीत सहभागी झाल्या होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चाचणीबद्दल डीआरडीओ सह इतर सर्व संस्थांचे अभिनंदन केले आहे. हे क्षेपणास्त्र हवाई दलाला अधिक सक्षम करेल, असे संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here