महाड (प्रतिनिधी) : रायगडमधील महाड तालुक्यातील तलीये गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील जवळपास ३० घरांवर दरड कोसळून मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ७२ रहिवासी बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गावाकडे जाणारा रस्ता खचल्यानं अद्याप मदत पोहोचू शकलेली नाही.
कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड तसेच कोकणपट्ट्यात मुसळधार पाऊस आहे. येथे पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चिपळूणसारख्या ठिकाणी तर घरांत पाणी घुसले आहे. रस्त्यावर तब्बल १० फूट पाणी साचले आहे. या पूरस्थितीमध्ये अनेक नागरिक त्यांच्या घरात अडकले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी बचावपथकं तैनात करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे आता आणखी एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील बिरवाडीपासून १४ किलोमिटवर एक दरड कोसळल्याची माहिती मिळतेय. या घटनेत तब्बल ३० घरे दबल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या घरामधील एकूण ७२ लोक या कोसळलेल्या दरडीखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
Landslide reported in Kalai village. Till now, there is no information on how many people have been affected. We have informed the NDRF team. The authorities are finding it difficult to reach the location due to water logging: District Collector Raigad, Maharashtra
— ANI (@ANI) July 22, 2021
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. महाड आणि माणगाव तालुक्यात बुधवारी रात्रीपासून पाऊस बरसत असून आता पुन्हा पाऊस वाढला आहे. येथील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड शहरात अजून पाणी भरलेले आहे.
भोर-महाड मार्गावर अनेक ठिकणी दरडी कोसळल्याने वरंधा घाट बंद करण्यात आलाय. पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेक प्रवाशी अडकले आहेत. त्यामुळे रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या परिसरात २४९ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. बुधवारी रात्रीपासून या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडतोय. या मार्गावर अनेक ठिकाणी पडझड झालीय. याच भोर-महाड मार्गाची पाहणी करण्यात येणार आहे. तोपर्यंत भोर-महाड रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.






