अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर मुंबई पोलिसांनी टाकला छापा

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : मुंबई पोलिसांनी सोमवारी अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक केल्यानंतर आज मुंबई पोलिसांनी याचसंदर्भात राज यांची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला.

यासंदर्भातील वृत्त डीएनए या वेबसाईटने दिलं आहे. शुक्रवारी मुंबई न्यायालयाने शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा आणि त्यांचे सहकारी रायन तोरपे यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी आज जिल्हा न्यायालयासमोर कुंद्रा आणि तोरपे यांना हजर केलं. त्यावेळी मुंबई पोलिसांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ऑनलाइन बेटींगमध्ये पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा वापरण्यात आल्याची शक्यात व्यक्त करत मुंबई पोलिसांनी अधिक तपासासाठी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनती केली होती. न्यायालयाने त्यानुसार या दोघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आता हॉटशॉर्ट अ‍ॅपबरोबरच राज कुंद्रांच्या मालकीच्या आणखीन एका वेबसाईटसंदर्भातील तपास सुरु केलाय. कुंद्रा यांनी जेएल स्ट्रीम्ससोबत सुरु केलेल्या एका वेबसाईटचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार शिल्पा शेट्टीने या वेबसाईटसाठी एक जाहिरातही शूट केली होती. पाच महिन्यांपूर्वी शिल्पाने या वेबसाईटसाठी प्रमोशनल व्हिडीओ शूट केलेले. या वेबसाईटवरही अडल्ट कंटेट उपलब्ध असून ही वेबसाईट अद्यापही भारतामधून सुरु असल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळेच आता ही जाहिरात आणि या कंपनीशी शिल्पा शेट्टीचा काय संबंध आहे याबद्दल पोलिसांकडून चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

दरम्यान, राज कुंद्रांच्या यस बँक खात्यावरुन युनायटेड बँक ऑफ आफ्रिकेतील खात्यावर किती पैसे वळवण्यात आले यासंदर्भातील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी न्यायालयाने सांगितलं. याच तपासासाठी पोलिसांना आता न्यायालयाने चार दिवसांचा कालावधी दिला असून २८ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here