सद्यस्थितीची माहिती देत बचावकार्यासाठी सैन्यदलाची मदत मिळण्यासाठी केली चर्चा
मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने कोकण व पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. अजित पवार यांनी राजनाथ सिंह यांना राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली आहे. संकटग्रस्त भागांत सैन्यदलाची अधिकची मदत उपलब्ध करून देण्याचं आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी दिलं आहे.
महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, गुहागर, पाटण, शिराळा, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये पूरस्थिती गंभीर असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ व सैन्यदलांची मदत घेण्यात येत आहे. लष्कर व नौदलही बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून गरजेनुसार सैन्यदलाची अधिकची मदत तयार ठेवण्यात आली आहे.
अतिवृष्टीग्रस्त भागात रस्ते वाहून गेल्याने व दरड कोसळल्याने ज्या गावांचा संपर्क तुटला आहे, तिथल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे व खाद्यपदार्थांची पाकिटे पुरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्थांनीही आपत्कालीन परिस्थितीत आपापल्या भागातल्या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या बचाव व मदतकार्यात सहकार्य करावं. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांनीही सुरक्षितस्थळी आसरा घेऊन परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत बाहेर पडू नये, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलिस किंवा स्थानिक प्रशासनाशी, लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारनं मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने बचावकार्याचा आढावा घेत असून आवश्यक निर्देश तातडीने दिले जात आहे, अशी माहिती स्वत: अजित पवार यांनी दिली आहे.






