इस्त्रायलच्या खेळाडूशी खेळण्यास अल्जेरियाच्या खेळाडूने दिला नकार; खेळाडू, प्रशिक्षकावर मोठी कारवाई

टोकियो : खेळाच्या माध्यमातून जागतिक ऐक्याचा व खिलाडूवृत्तीचा संदेश देणाऱ्या ऑलिम्पिंक स्पर्धांमध्ये इस्त्रायलच्या खेळाडूशी खेळण्यास अल्जेरियाच्या खेळाडूने नकार दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इस्त्रायलच्या ज्युडो खेळाडू सोबत खेळण्यास नकार देणाऱ्या अल्जेरियाच्या खेळाडूला ऑलिम्पिकमधून निलंबित करण्यात आले त्याच बरोबर त्याला टोकियोमधून परत पाठवण्यात आले.

ज्युडोच्या ७३ किलो गटातील दुसऱ्या फेरीत अल्जेरियाच्या फेथी नॉरिनला इस्त्रायलच्या खेळाडूशी लढायचे होते. ही लढत सोमवारी होणार होती. त्याआधी फेथीला सुदानच्या मोहम्मद अब्दुलरसूल विरुद्धची लढत जिंकावी लागणार होती. पण फेथीने ऑलिम्पिकमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत वृत्तसंस्था डेली मेलशी बोलताना फेथीने सांगितले की, आम्ही ऑलिम्पिकमध्ये पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. पण पॅलेस्टाइनचा मुद्दा यापेक्षा मोठा आहे. प्रशिक्षक बेनिखाल्फ म्हणाले, आमच्यासाठी ड्रॉ चांगला नव्हता. आम्हाला इस्त्रायलच्या खेळाडू सोबत खेळायचे होते. यामुळे आम्ही माघार घेतली. आम्ही योग्य निर्णय घेतला.

दरम्यान आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनने भेदभावाविरोधात आमचे नियम फार कठोर आहेत. ऐक्य वाढविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ज्युडोच्या मुल्यात याचा समावेश होतो असे सांगत फेथी नॉरीन आणि त्याचे प्रशिक्षक अमर बेनिखाल्फ यांना निलंबित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here