पनवेल (प्रतिनिधी विनया म्हात्रे-मेढेकर) : पनवेल कार्यक्षेत्रातील चारही प्रभागामधील नागरी प्राथमिक आरेाग्य केंद्रामध्ये २३ जुलै ला ९० बेघर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. ज्यांच्याकडे कोणताही शासकिय पुरावा नाही, आधार कार्ड नाही अशा रस्ते, उड्डाणपुलाखालील जागा येथे आढळणा-या निराधार -बेघर व्यक्ती, असे दुर्लक्षित घटक लसीकरणापासून वंचित राहू नयेत याकडे पनवेल महानगरपालिका लक्ष देत आहे.
कोरोनाच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर टेस्टींग आणि लसीकरणावर पनेवल महानगरपालिका भर देत आहे. लसींच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आयुक्त श्री. गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिका क्षेत्रातील निराधार – बेघरांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाला सुरूवात करण्याआधी या नागरिकांना जेवण देण्यात आले व नंतर कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात आले.
पनवेल महापालिका क्षेत्रातील समाजातील कोणताही घटक दुर्लक्षीत राहणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. वृध्दाश्रम, अनाथाश्रमात असलेले बेडवरील रूग्ण, वृध्द तसेच दिव्यांग व्यक्ती यांच्याकरिता विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला लसीकरणामध्ये सामावून घेण्यासाठी महानगरपालिकेच्या दीनदयाळ उपाध्याय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व वैद्यकिय आरोग्य विभाग यांच्यावतीने या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. या लसीकरणासाठी रोटरी क्लब, कोमोठे यांनी पालिकेला मदत केली.
या लसीकरणावेळी खारघर येथे सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, वैद्यकिय अधिकारी मनिषा चांडक, विनया म्हात्रे, कोमोठे येथे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वैद्यकिय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर तसेच प्रत्येक ठिकाणी तेथील प्रभाग अधिकारी उपस्थित होते.






