बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी दुपारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सादर करणार असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.आता कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदासाठी केंद्रीय कायदामंत्री प्रल्हाद जोशी, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, खाणउद्योग मंत्री मुरुगेश निराणी, डॉ. सी. एन. अश्वथनारायण, बोम्मरबेट्टू संतोष यांची नावे चर्चेत आहेत. या पैकी एक नाव मुख्यमंत्री पदासाठी फायनल होण्याची शक्यता आहे.
I have decided to resign. I will meet the Governor after lunch: Karnataka CM BS Yediyurappa at a programme to mark the celebration of 2 years of his govt pic.twitter.com/sOn0lXAfeD
— ANI (@ANI) July 26, 2021
आज सायंकाळी चार वाजता ते राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत. २६ जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर येडीयुरप्पा यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.
गेल्या शुक्रवारी येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या बैठकीत येडियुरप्पा यांनी वयाचं कारण देत आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. पण येडियुरप्पा यांनी मांडलेला प्रस्ताव स्विकारायचा की नाही हे पक्षावर अवलंबून असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलं होतं. पण त्यानंतर आज त्यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.






