औरंगाबादमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण; शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजपचा आरोप

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : शहरात भाजपाच्या ओबीसी मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गोविंद केंद्रे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. केंद्रे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकाराबाबत जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

शिवसेना नेते आणि माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि शिवसेनेच्या इतर कार्यकर्त्यांनी प्रा. केंद्रे यांना मारहाण केल्याचा भाजपचा दावा आहे. केंद्रे यांचे अपहरण करुन त्यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. केंद्रे यांच्या नातेवाईकांनी ही तक्रार दिली असून याप्रसंगी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस भगवान घडमोडे, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये, शहर सरचिटणीस समीर राजुरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप कार्यकर्ते प्रा. केंद्रे यांच्यावरील हल्ल्याचा भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध करत मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस भगवान घडमोडे यांनीही शिवसेनेवर आक्रमक टीका करत संबंधित आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here