पूरग्रस्तांना सढळ हस्ते मदत करण्याचे उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : कोरोनाचे संकट असतानाच महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडाला. अशा संकटकाळात राज्यातील जनता शोकाकुल असताना माझा वाढदिवस साजरा करू नका. कुठेही वाढदिवसाचे समारंभ नकोत. त्याऐवजी पूरग्रस्तांना सढळ हस्ते मदत करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.
दरड कोसळण्याच्या घटना तसेच पुरामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये योगदान देऊन सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
आज मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये, तसेच फलक व पोस्टर्स लावू नयेत, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत.







