कोरोनाचे कारण देत पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या कर्मचाऱ्यांना हॉटेलमध्ये ठेवले ‘नजरकैदेत’

आगरतळा : येथे २०२३ मध्ये विधानसभा निवडणुकांकरिता तृणमूल काँग्रेससाठी राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची कंपनी आयपॅकचे २० ते २२ कर्मचारी गेले होते. येथील एका हॉटलमध्ये हे कर्मचारी उतरले असताना पोलिसांनी त्यांना बाहेर जाण्यास मनाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

या टीममधील कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेससाठी शक्यता आणि तेथील परिस्थिती याचा अंदाज घेण्यासाठी गुप्तपणे फिरत होते. हॉटेल वुडलँडमध्ये हे कर्मचारी राहिले आहेत. पोलिसांना याची कोणीतरी खबर दिली आणि प्रशासनाने सुत्रे हलवत या कर्मचाऱ्यांना हॉटेलमधून बाहेर पडण्यास बंदी घातली आहे. यासाठी मात्र कोरोना प्रोटोक़ॉलचे कारण देण्यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळत नसल्याने त्यांना हॉटेलमधून बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यांनी कोणताही आरटीपीसीआर रिपोर्ट सादर केलेला नसल्याने, या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

दुसरीकडे टीएमसीचे त्रिपुरा अध्यक्ष आशिष लाल सिंह यांनी हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप केला हे. आयपॅकची टीम इथे सर्व्हेक्षणासाठी आली होती. राज्य सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. कारण ते त्यांच्या सर्व्हेक्षणाच्या निकालांना घाबरत आहेत. त्रिपुराची ही संस्कृती नाही. दरम्यान, भाजपाने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आयपॅकच्या सदस्यांनी आपल्य़ाला पोलिसांनी कोणतेही कारण दिले नसल्याचा आरोप केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here