सीबीआय विवाद, चारा घोटाळा, सुशांत केसमुळे आहे चर्चेत
नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने वरिष्ठ आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. १९८४ बॅचचे आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना हे आतापर्यंत सीमा सुरक्षा दलाचे संचालक होते. त्यांची दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर आयटीबीपीचे महासंचालक एस. एस. देवसाल यांच्याकडे सीमा सुरक्षा दलाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. गुजरात कॅडरचे अधिकारी असलेल्या अस्थाना यांच्या निवृत्तीच्या तीन वर्षे आधी ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना वर्षे वाढ देण्यात आली आहे.
राकेश अस्थाना यांनी बिहारच्या नेतरहाट (आता झारखंडमध्ये आहे) विद्यालयात प्रथामिक शिक्षण घेतलं. शालेत अतिशय हुशार विद्यार्थी होते. सरदार वल्लभभाई पटेल यांना ते आपला आदर्श मानतात. उच्च शिक्षणासाठी ते दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आले. त्यावेळी ते सर्वात हुशार विद्यार्थी म्हणूनच ओळखले गेले. पहिल्याच प्रयत्नात ते केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससीची परीक्षा पास झाले.
यूटी कॅडरचे एन. एन. श्रीवास्तवर ३० जूनला दिल्ली पोलिस आयुक्तपदावरून नियुक्त झाले होते. यानंतर बालाजी श्रीवास्तव यांना दिल्लीचे आयुक्त करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे दिल्लीत १९ वर्षांनंतर यूटी कॅडरच्या बाहेरील अधिकाऱ्याला सर्वोच्च पदावर स्थान दिलं गेलं आहे. यापूर्वी १९९६ मध्ये आयपीएस अधिकारी अजय शर्मा यांना ही संधी मिळाली होती. उत्तर प्रदेश कॅडर असतानाही अजय शर्मा याना जुलै १९९९ मध्ये दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलं होतं. ते जून २००२ पर्यंत पदावर होते.
अतिशय हुशार आणि स्मार्ट अधिकारी अशी राकेश अस्थाना यांची ओळख आहे. चारा घोटाळ्यासंबंधीत प्रकरणांच्या चौकशीत राकेश अस्थाना यांनी मोठी भूमिका बजावली होती. सीबीआयचे एसपी असताना त्यांनी चारा घोटाळा प्रकरणाची चौकशी केली होती. अस्थाना हे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अतिरिक्त महासंचालकही होते. त्यांच्या देखरेखीखाली अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युशीसंबंधीत अंमली पदार्थ प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती.






