मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना उपाचारांसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जयंत पाटील यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे. कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पाहणी केलेली आहे.
आज मंत्रीमंडळाची बैठक सुरू असताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते मंत्रीमंडळाच्या बैठकीतून बाहेर आले. त्यानंतर त्यांना आता रुटीन चेकअपसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले आहे. जयंत पाटील यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर काही मंत्री रुग्णालयात पोहोचले आहेत. माहितीनुसार जयंत पाटील यांची प्रकृती स्थिर आहे.







