किमान आधारभुत किंमत ज्वारी खरेदी मुदत एक महिना वाढवा : शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांची मागणी

hemant-salunkhe

शिंदखेडा (प्रतिनिधी) : खरीप पणन हंगाम 2020-21 (रब्बी) मध्ये किमान आधारभुत किंमत भरडधान्य (ज्वारी) खरेदी कालावधी वाढवुन मिळावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ व महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, शासनाने खरीप पणन हंगाम 2020-21 (रब्बी) मध्ये किमान आधारभुत किंमत भरडधान्य (ज्वारी) खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याचे आदेश केंद्र शासनाकडून प्राप्त झालेत. त्यानुसार धुळे जिल्ह्यात वाढीव एकुण 30230 क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट प्राप्त झालेत.

धुळे जिल्ह्यात ज्वारी खरेदीसाठी एकुण चार हजार दोनशे चोपन्न शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्याला ज्वारी खरेदीचे उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. परंतु महाराष्ट्र शासनाचे सहसचिव यांनी दि. 26/07/2021 रोजी व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र पाठवून ज्वारी खरेदीची मुदत 31/07/2021 पर्यंत दिलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य को.ऑफ मार्केटिंग फेडरेशनचे सर व्यवस्थापक यांनी दि. 27/07/2021 रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना दि. 31/07/2021 पुर्वी ज्वारी खरेदी करण्यांत यावी असे आदेश दिलेत. पुन्हा शासनाचे सहसचिव यांनी दि. 28/07/2021 रोजी सुधारीत उद्दिष्ट वाढीचे पत्र व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य को.ऑफ मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई यांना दिलेत.

त्यानुसार जिल्हा मार्केटिंग अधिकारी, धुळे / नंदुरबार यांना त्याच दिवशी प्राप्त झालेत. त्यानुसार त्यांनी दि. 29/07/2021 रोजी म. जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पत्र देऊन दि. 31/07/2021 पर्यंत ज्वारी खरेदी उद्दिष्टे पुर्ण करण्यात यावी असे कळविले. त्यानुसार महसुल यंत्रणेमार्फत दि. 29/07/2021 रोजी दुपारी एक वाजेपासून ज्वारी खरेदी प्रक्रिया सुरु करण्यात आली. परंतु चारही तालुक्यांमध्ये एकुण चार हजार दोनशे चोपन्न शेतकऱ्यांची तीस हजार दोनशे तीस क्विंटल ज्वारी तीन दिवसात कशी खरेदी होऊ शकेल?

सद्य परिस्थितीत शासनाने ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केलेत. परंतु खरेदी प्रक्रियेची मुदत कमी असल्याने सदर योजनेपासुन शेतकरी वंचित राहु शकतात. म्हणून किमान आधारभुत किंमत हमीभाव ज्वारी खरेदीची मुदत किमान एक महिना वाढवावी, असेही शेवटी पत्रात म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here