दुसर्‍या टप्प्यातील वाहन खरेदीसाठी निधी वितरीत; पालकमंत्र्यांचा पुढाकार

जळगाव जिल्हा पोलीस दलास मिळणार १५ बोलेरो आणि ३९ होंडा शाईन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : जिल्हा पोलीस दलाच्या बळकटीकरणासह आपले पोलीस संकल्पनेच्या अंतर्गत १५ बोलेरो आणि ३९ होंडा शाईन दुचाकींसाठी निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून वितरीत करण्यात आला आहे. यामुळे दुसर्‍या टप्प्यातील ही वाहने लवकरच पोलीस दलात दाखल होणार आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. पोलिस दलात असलेली वाहने कालबाह्य झाल्याने तसेच त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अधिक पैसा खर्च होत असल्याने पोलिस दलाकडून जिल्हा नियोजन समितीकडे वाहनांसाठी पोलिस अधीक्षकांनी प्रस्ताव सादर केला होता. पालकमंत्र्यांनी यासाठी तातडीने कार्यवाही करून २३ जानेवारी २०२१ रोजी २ कोटी ३२ लाख ४१ हजार ७१ रूपयांची तरतूद केली होती. कोविडच्या आपत्तीमुळे हा निधी एकदा देण्यात आला नसून याचे दोन टप्पे करण्यात आले. यातील पहिल्या टप्प्यासाठी ९९ लाख ३२ हजार रूपयांच्या वाहने खरेदीला मंजुरी देण्यात आली होती. यातून जिल्हा पोलीस दलास १४ बोलेरो वाहने प्रदान करण्यात आली होती.

यानंतर आता दुसर्‍या टप्प्यासाठी उर्वरित १ कोटी ३३ लाख रूपयांचा निधी जिल्हा पोलीस दलाकडे वितरीत करण्यात आला आहे. यातून महेंद्रा बोलेरो बी-४ बीएसव्हीआय या मॉडेलची १५ वाहने आणि ३८ होंडा शाईन दुचाकी गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. या गाड्यांना वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलात दाखल होण्याआधी आवश्यक असणारे बदल करण्यात येत असून लवकरच एका कार्यक्रमात यांना पोलीस दलात दाखल करण्यात येणार आहेत.

पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्हा पोलीस दलास ही वाहने मिळणार असून यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी सहकार्य केले आहे. लवकरच एका कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ही वाहने जिल्हा पोलीस दलात सुपुर्द करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here