मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राज्यात २५ जिल्ह्यातील कोरोना वाढीचा दर कमी आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर राज्य अनलॉक करण्याची मागणी आता व्यापारी आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडूनही जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी टास्क फोर्सबरोबर चर्चा केल्यानंतर आज लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा आदेश जारी होण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनचे नियम शिथील करण्याबाबत टास्क फोर्सबरोबर चर्चा झाल्यानंतर नियम जाहीर होतील अशी शक्यता होती. मात्र अजूनही याबाबतचे आदेश जारी झालेले नाहीत. या आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही शिल्लक असल्याने तो रखडला आहे. राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे. विशेषतः दुकानांच्या वेळा वाढवण्याची मागणी राज्यभरातील लहान व्यापारी करत आहेत. दोन महिने झाले व्यापा-यांनी विविध माध्यमातून ही मागणी केली आहे.
मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौर्यावर असल्यामुळे या आदेशावर सही होऊ शकलेली नाही. त्यामुळे आज आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही होऊन तो जारी केला जाण्याची शक्यता असून १ ऑगस्टपासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जाणार असल्याचे समजते.
राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनीही मंत्रीमंडळ बैठकीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याची मागणी अनेकदा लावून धरली. मात्र मुख्यमंत्री शिथिलता देण्याच्या मानसिकतेत नव्हते. गुरुवारी पार पडलेल्या टास्क फोर्सबरोबरच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा आदेश जारी होईल असं सांगितलं जात होत. याबाबतचे आदेश तयार असल्याची माहिती आहे, मात्र याबाबतच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही झाली नसल्याने आदेश जारी होऊ शकलेले नाहीत.






