मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीच्या दौऱ्यावर; कृष्णा-वारणेच्या पुरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज (दि.२) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते.

कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालं होतं. कोयना धरणातून विसर्ग करण्यात येत असल्यानं सांगलीत अजूनही कृष्णा नदीची पाणी पातळी वाढण्याचा धोका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर सांगलीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

२७ जुलै रोजी अखेर प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा काठी असणाऱ्या शिराळा, वाळवा ,पलूस आणि मिरज तालुक्यातील सुमारे २४७ गावातील ९७ हजार ४८५ शेतकऱ्यांची ४० हजार हेक्टरहुन अधिक शेती बाधित झाली आहे. यामध्ये मुख्यतः ऊस, सोयाबीन,भुईमूग या पिकांच्या बरोबर भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे.जवळपास पन्नास कोटी इतका नुकसानीची आकडा असल्याचे कृषी विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. तर, अद्याप अनेक गावात पुराचे पाणी आहे.

अनेक गावात पंचनामे सुरूच आहेत.पूर ओसरल्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून २०१९ मधील महापुराच्या पेक्षा यावेळी शेतीचे क्षेत्र अधिक बाधित झाल्याचे कृषी अधीक्षक बस्वराज मास्तोळी यांनी सांगितले आहे. मिरज तालुक्यातील मौजे डिग्रजला ही पुराच्या पाण्याने पूर्ण वेढा घातला होता. त्यामुळे गावात घराच्या वर पाणी गेले होते. तर त्यामुळे येथील शेती पूर्णतः हा पाण्याखाली गेली होती.तर काही ठिकाणी ऊस शेती अक्षरश: जमीनदोस्त झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here