टोकियो : टोकियो ऑलिंम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ताय झू-यिंगने जगज्जेत्या सिंधूला धूळ चारली. त्यामुळे पाच वर्षांची मेहनत आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरही सिंधूचे ‘सुवर्णस्वप्न’ अधुरेच राहिले. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर नाव कोरणारी २६ वर्षीय सिंधू यावेळी त्या पदकाचे सुवर्णामध्ये रूपांतर करेल, अशी सर्वाना आशा होती.
पी. व्ही. सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असले, तरी तिने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. आज रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पराभव करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे.
बिंग जिआओविरुद्धच्या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या गेममध्ये ११-८ अशी आघाडी घेतली. यानंतर १६-१०, १९-१२ अशी आघाडी टिकवली आणि पहिला गेम २१-१२ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही भारतीय शटलरने चांगली सुरुवात केली आणि ५-२ अशी आघाडी घेतली. पहिला गेम गमावल्यानंतर, बिंग जिआओ दबावाखाली असल्याचे दिसून आले.
या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. तिच्या व्यतिरिक्त दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.






