ग्रेट ब्रिटनला धूळ चारत भारताच्या पुरूष हॉकी संघाची उपांत्य फेरीत
टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या हॉकीमध्ये उपांत्य पूर्व फेरीत भारताने ग्रेट ब्रिटनवर ३-१ असा शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाची उपांत्य फेरीत आता बेल्जियम विरुद्ध होणार आहे. भारतीय हॉकी संघने ४१ वर्षानंतर ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
१९२८ मध्ये भारताच्या हॉकी संघाने अम्सटर्डममध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत पहिल्यांदा सुवर्ण पदक पटकावलं. भारताने ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, स्वित्झर्लंड आणि अंतिम सामन्यात नेदरलँडला पराभूत केलं होतं. त्यानंतर १९३२ मध्ये भारताने अमेरिकेला २४-१ ने विक्रमी फरकाने पराभूत केलं होतं. ही विजय आजही स्मरणात आहे. बर्लिन ऑलिम्पिक १९३६ स्पर्धेमध्ये भारताने जर्मनीला ८-१ ने पराभूत केलं. त्यावेळेस भारत ब्रिटिश इंडियाकडून स्पर्धेत खेळत होता.
WE'RE THROUGH TO THE SEMIS!!! #TeamIndia will take on Belgium in the semi-final!!!
A perfect quarterfinal victory at #Tokyo2020 #Cheer4India pic.twitter.com/Ru23RMdseC
— SAIMedia (@Media_SAI) August 1, 2021
भारताने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळी केली. दिलप्रीत सिंहने ७ व्या मिनिटाला गोल झळकावत १-० ने आघाडी घेतली. त्यानंतर गुरजंत सिंहने १६ व्या मिनिटाला गोल केला आणि २-० ने आघाडी मिळवून दिली. ब्रिटनने ४५ व्या मिनिटाला कॉर्नरच्या माध्यमातून गोल केला आणि दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. सॅम्युअल इआनने गोल केला. त्यानंतर ५४ व्या मिनिटाला मनप्रीतला पिवळं कार्ड दाखवण्यात आलं आणि ब्रिटनला आणखी एक कॉर्नर मिळाला. मात्र भारताचा गोलरक्षक श्रीजेशने गोल अडवला आणि भारतीय चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. भारताने आक्रमक खेळी केली आणि ५७ व्या मिनिटाला हार्दीक सिंहने गोल केला. या गोलसह भारताने ३-१ अशी आघाडी मिळवून विजय मिळवला.






