हजारो कोटींचं पॅकेज जाहीर करण्याचं थोतांड मला जमत नाही’ – मुख्यमंत्र्यांचा सांगली पूरग्रस्तांना दिलासा

सांगली (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी अकराच्या सुमारास भिलवडी येथे पोहोचले. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडून पुराने झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. परिसरातील पूरग्रस्तांनी मागण्यांचे प्रातिनिधिक निवेदन मुख्यमंत्र्यांकडे दिले.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, ‘राज्यावर संकटांची मालिका सुरू आहे. यातून आपण मार्ग काढणारच असा मला आत्मविश्वास आहे. तातडीच्या मदतीसाठी अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागतील. यासाठी तुमचे सहकार्य अपेक्षित आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जे जे शक्य आहे ते ते सर्व सरकार करणार आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही,’ लवकरच तातडीची मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचेल. काही ठिकाणी कायमस्वरूपी उपायांची अंमलबजावणी करावी लागेल. यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान भिलवडी येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यात अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते. हा प्रकार लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मास्क वापरण्याचे आवाहन केले. करोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे मास्क वापरा आणि गर्दी टाळा असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here