पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : दीड महिन्यांपूर्वीच वेदिकाला उपचारासाठी आवश्यक असलेलं १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आलं.वेदिकाचे काका अमोल जगताप यांनी सांगितल, “इंजेक्शन दिल्यानंतर तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत होती. परंतु रविवारी (१ ऑगस्ट) अचानक ऑक्सिजनची पातळी कमी झाली आणि तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं पण तिचा मृत्यू झाला.
भोसरी येथील ११ महिन्यांच्या वेदिका सौरभ शिंदे हिला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप-वन हा दुर्मिळ आजार झाला होता. वेदिकाच्या उपचारासाठी लोकवर्गणीतून निधी उभारला होता. अमेरिकेतून इंजेक्शन मागविले होते. त्यावरील सहा कोटी रुपयांचे आयात शुल्क केंद्र सरकारने माफ केले होते.
तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात ‘झोलगेन्स्मा’ हे १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन पंधरा जून रोजी दिले होते. तेव्हा पासून तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. पण, सहाच्या सुमारास तिचे निधन झाले.






