बारावीचा निकाल उद्या दुपारी ४ वाजता जाहीर होणार

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षांच्या निकालाची उत्सुकता सर्वच विद्यार्थ्यांना होती. गेला महिनाभर राज्यात पडलेल्या पावसाचा, पूरपरिस्थितीचा फटका बारावीच्या निकाल प्रक्रियेला बसल्याने दिलेल्या मुदतीपेक्षा हा निकाल लांबणीवर पडला होता. मात्र आता उद्या (दि.३) हा निकाल जाहीर होणार आहे.

पाऊस आणि पुरामुळे काही शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांकडून निकाल प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितल्याने अंतिम टप्प्यात असलेली निकालाची प्रक्रिया काहीशी लांबली होती. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व मंडळांना बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. मात्र राज्य मंडळाला ही मुदत पाळता आली नव्हती. मात्र प्रतिक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता असून, उद्या (दि.३) मंगळवारी हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा शिक्षण विभागाने जाहीर केला होता. महाराष्ट्र सरकारने बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दहावी साठी ३० टक्के, अकरावी साठी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here