नांदेड (प्रतिनिधी) : मी कुठलीही आढावा बैठक घेतलेली नसून, जनतेच्या विकासाचे जे तीन डेव्हलपमेंट बोर्ड आहेत, त्याचे अधिकार मला संविधानाने दिले आहेत. मी ज्या ही ठिकाणी जातो तिथे अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी त्याबाबत चर्चा करतो, तशीच ती आजही केली, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.
राज्यपाल आज नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्यावरून राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी त्यांच्यावर सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याची टीका केल्याने, त्यांनी ही प्रतिक्रिया उपस्थितांना दिली. आज नांदेडमध्ये राज्यपालांनी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात मुलींच्या आणि मुलांच्या वसतिगृहांचे उद्घाटन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
मात्र राज्य सरकारातील मंत्र्यांनी टीका केल्याने ही बैठक शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. या बैठकीबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, ही बैठक नसून केवळ अधिकाऱ्यांसोबत चर्चा असल्याचे सांगत राज्यपाल पुढे म्हणाले की, इथे चांगली कामे झाली आहेत. जनतेच्या विकासासाठी जे तीन बोर्ड आहेत, त्याचा अधिकार मला संविधानाने दिला आहे. त्यानुसार मी जिथे जातो तिथे दोन चार अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करतो तशीच चर्चा आजही केली.






