नांदेड (प्रतिनिधी) : तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात जाऊन पायरीचे घेता आले दर्शन, याचा मला मनस्वी आनंद असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. आज (दि.५) नांदेड येथे दौऱ्यावर आले असताना ते बोलत होते.
कोरोनामुळे धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद असल्याने, राज्यपालांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराच्या पायरीचे दर्शन घेतले. नांदेड दौऱ्यामध्ये राज्यपालांनी विद्यापीठातील विविध कामांची पाहणी केल्यानंतर गुरुद्वारा येथे दर्शनासाठी आले होते.
श्री गुरु गोबिंदसिंहजी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या नांदेडमध्ये येण्याची माझी फार दिवसांची इच्छा होती. आज गुरुद्वाराच्या पायरीचे दर्शन घेऊन ती इच्छा पूर्ण झाल्याची भावना यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी ड़ॉ विपिन इटनकर, महापालिकेचे ड़ॉ सुनील लहाने यांच्यासह गुरुद्वाराचे अधिकारी उपस्थित होते. गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने यावेळी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांचा सत्कार करण्यात आला.






