बाल विवाह प्रतिबंध जनजागृतीसाठी सप्टेंबरपर्यंत राज्यव्यापी मोहिम

बालविवाहाला विरोध करणाऱ्या घटकांना मोहिमेचे बळ मिळेल – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : कोरोना काळात राज्यात ७९० बालविवाह रोखण्यात आले आहेत. त्यामुळे वाढत्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ आणि अक्षरा सेंटर यांनी एकत्र येऊन आजपासून सप्टेंबर २०२१ अखेर राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा शुभारंभ महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

या मोहिमेमध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रचार, प्रसार साहित्याची देवाण-घेवाण, समाजमाध्यमांच्या माध्यमातून बालविवाह रोखणाऱ्या मुलींच्या कथा, पालकांना समुपदेशन, या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना या कामाशी जोडून घेणे आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. या मोहिमेचा शुभारंभ करताना मंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते बालविवाह प्रतिबंध आवाहनाच्या ४ माहिती फलकांचे अनावरण करण्यात आले. यावेळी युनिसेफ महाराष्ट्रच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, अक्षरा सेंटरच्या सहसंचालक नंदिता शाह आदी उपस्थित होते.

त्या पुढे म्हणाल्या की, आज ही मोहीम सुरू करताना मला आनंद होत आहे. यामुळे बालविवाहाला विरोध करणाऱ्या मुली, अंगणवाडी ताई, बालविवाह प्रतिबंध करणारे ग्रामसेवक, शिक्षक, ग्रामविकास विभागाचे अधिकारी, बाल संरक्षण समित्या, जिल्हा बाल संरक्षण युनिट, बाल कल्याण समित्या आदींना बळ मिळेल.

श्रीमती नंदिता शाह यांनी सांगितले, गेल्या वर्षी, टाळेबंदीच्या दरम्यान घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे आम्हाला धक्का बसला होता. त्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले, याविरोधात मोहीम राबवली. आता बालविवाहांचे वाढते प्रमाण ही चिंता करण्याची बाब आहे. आम्ही महिला व बालकल्याण विभागाच्या आणि युनिसेफच्या सहकार्याने सुरू करत असलेली जनजागृती मोहीम बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळवेल, असा विश्वास आहे.

या मोहिमेमुळे बालविवाह रोखण्यासाठी काम करणारे अनेक अपरिचित लोकही बालविवाह प्रतिबंध चळवळीशी जोडले जाऊन बालविवाह थांबल्याचे सकारात्मक परिणामही पुढील काळात समोर येतील, असे या मोहीमेच्या प्रवक्त्या साक्षी तन्वर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here