मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : सध्या राज्यात ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे त्यामुळे येत्या १७ ऑगस्टपासून राज्यातल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. रुग्णसंख्या कमी झाली आहे, अशा ठिकाणी ग्रामीण भागात ५वी ते ८वीच्या शाळा देखील सुरू करण्याचा विचार आहे. त्यासोबतच शहरी भागात महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील ८वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या समितीप्रमाणेच शहरी भागांसाठीही समितीची नियुक्ती करण्यात येईल”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
राज्यात सध्या कोरोनासंदर्भातले निर्बंध लागू आहेत. कोरोनाच्या स्थानिक परिस्थितीनुसार कोरोनाचे निर्बंध देखील काही ठिकाणी शिथिल तर काही ठिकाणी कठोर अशा स्वरूपाचे आहेत. करोना रुग्णसंख्या कमी झालेल्या राज्याच्या ग्रामीण भागात आधीच शाळा सुरू करण्याची मुभा राज्य सरकारने दिली असून त्यासाठी कोरोनाची रुग्णसंख्या आणि इतर अटी घालून दिल्या आहेत. आता त्यामध्ये अधिकच्या वर्गांचा समावेश देखील केला जाणार आहे.
कोरोना काळात राज्यातील शाळा पूर्णपणे बंद असल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबावा लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वच बोर्डांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, एकीकडे कोरोनाचं प्रमाण काहीसं नियंत्रणात येत असल्याचं दिसत असल्यामुळे राज्यात शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय येत्या आठवड्याभरात होण्याची शक्यता आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तशी माहिती दिली आहे.







