रात्री ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत संचारबंदी : महाराष्ट्र, केरळच्या सीमावर्ती भागात आठवडाअखेर लॉकडाऊन
बंगळुरू : कर्नाटक सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर उपायोजना करण्यास सुरुवात केली आहे. राज्यामध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. केरळ व महाराष्ट्राशी सीमा असलेल्या जिल्ह्यांमध्ये आठवडाखेर संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी माध्यमांनी दिली.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी कोव्हिड व्यवस्थापनाबाबत मंत्री, कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य आणि विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र, केरळशी सीमा असलेल्या जिल्ह्यांमध्ये आठवडाखेर संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. रात्री ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत कर्नाटकमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नववी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बॅचप्रमाणे २३ ऑगस्टला शाळेमध्ये येण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन इतर वर्गांसाठी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
उद्या मंत्र्यांना खातेवाटप आणि नवीन कोव्हिड टास्क फोर्स करण्यात करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. मुख्यमंत्र्याच्या बैठकीला मंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थ नारायण, डॉ. के. सुधाकर, राज्याचे मुख्य सचिव रवीकुमार, स्पेशलिस्ट डॉक्टर सी. एन. मंजुनाथ, डॉ. सुदर्शन, डॉ. देवीप्रसाद शेट्टी हे उपस्थित होते.






