मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : काल रात्री उशिरा मुंबईत चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी फोन पोलिसांना आल्याने खळबळ उडाली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भायखळा आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला अशा चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत इतकंच सांगून संबंधित व्यक्तीने फोन ठेवून दिला होता.
या फोनमुळे सतर्क झालेल्या मुंबई पोलिसांनी या सर्व ठिकाणी बॉम्ब शोधक पथकाकडून शोधमोहीम सुरु करण्यात आली. सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशांना कुठलाही त्रास न होऊ देता ही शोधमोहीम सुरु करण्यात आली. मात्र शोध मोहीम आणि तपासाअंती फोन वरून मिळालेली माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या अफवेच्या कॉल प्रकरणी पोलिसांनी जालना येथील राजू कांगणे आणि रमेश शिरसाट या दोन जणांना ठाण्यातून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी याबाबत सांगितले की, शुक्रवारी कल्याण जवळ हे दोघेही पार्टी करत बसले होते, आणि पार्टीच्या दरम्यान या दोघांनी पोलिसांना फोन करून चार जागी बॉम्ब ठेवले असल्याची माहिती दिली होती. माहिती खोटी असल्याने निष्पन्न झाल्यानंतर त्या फोन करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू केला. फोन कोणत्या भागातून आला होता, त्याचा शोध घेऊन दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ते दोघे जालन्याचे रहिवासी असून त्यांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. त्या खोट्या कॉल संदर्भात सध्या मुंबई पोलिसांकडून त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती क्राईम ब्रँचकडून देण्यात आली आहे.






