त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या हत्येचा प्रयत्न? तीन आरोपींना अटक

आगरतळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचे शासकीय निवासस्थान श्यामाप्रसाद मुखर्जी लेनजवळ फिरायला गेले होते, तेव्हा कारमधील तीन जण त्यांच्या सुरक्षा घेऱ्यात घुसले. या तिघांना मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित गाडी देब यांच्याजवळून जातानाच देब बाजुला झाल्याने बचावले. मात्र या घटनेत त्यांचा एका सुरक्षा कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकाने गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.

यानंतर तीन जणांना केरचाऊमुहानी येथून अटक करण्यात आली असून त्यांची गाडीही जप्त करण्यात आली आहे. यानंतर आरोपींना शुक्रवारी मुख्य न्यायदंडाधिकारी पीपी पॉल यांच्या समोर उभे करण्यात आले. यानंतर त्यांना १४ दिवसांच्या रिमांडवर तुरुंगात पाठविण्यात आले आहे. सहाय्यक सरकारी वकील विद्युत सूत्रधर यांनी सांगितले, की हे कृत्य करण्यामागचा त्यांचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here