टोकियो : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकलं. त्याने ६५ किलो वजनी गटात कझाकिस्तानचा कुस्तीपटू दौलत नियाझबीकोव याला चीतपट करत पदकाला गवसणी घातली. बजरंगने ही लढत ८-० असा एकतर्फी जिंकली.
बजरंग पुनियाने कास्य पदकासाठीच्या सामन्यात कझाकिस्तानच्या कुस्तीपटूवर संपूर्ण वर्चस्व मिळवले. त्याने कझाकिस्तानच्या कुस्तीपटूला एकही गुण घेऊ दिला नाही. त्याने पहिल्या सत्रात दोन वेळा एक-एक गुणाची कमाई करत २-० ने आघाडी घेतली. त्यानंतर त्याने दुसऱ्या सत्रात २, २, २ असे एकपाठोपाठ गुण घेत कझाकिस्तानच्या खेळाडूला ८-० ने धूळ चारत कास्य पदक जिंकले. भारताचे हे सहावे पदक आहे.






