दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी; अल कायदाच्या नावाने आला होता ई-मेल

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांना एका ई-मेलद्वारे राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. दहशतवादी संघटना अल कायदाच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे.

१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. लाल किल्ल्यावरही अभूतपूर्व सुरक्षा ठेवली गेली आहे. तिथे अनेक ठिकाणी बॅरिकेडींग करण्यात आले आहे. काही खलिस्तानी बंडखोरांकडून हल्ल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. अतिसंवेदनशील ठिकाणी अँटी ड्रोन सिस्टीमही तैनात करण्यात आली आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर हा धमकीचा ई-मेल आल्याने दिल्ली पोलिस अलर्ट झाली आहे. एक जोडपं बॉम्बस्फोट घडवेल आणि रविवारी हा स्फोट केला जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी मार्च महिन्यातही अशाच प्रकारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीच्या ई-मेलनंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. सर्व सुरक्षा आणि तपास यंत्रणांना अलर्ट करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी तपासणी केली जात आहे.

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ऑपरेशन कंट्रोल सेंटरला काल ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमकीची माहिती मिळाली होती. करनबीर सुरी उर्फ मोहम्मद जलील आणि त्याची पत्नी शैली सारा उर्फ हसीना सिंगापूरहून भारतात येत आहेत. ते १ ते ३ दिवसांत बॉम्बस्फोट घडवणार आहेत. अशा प्रकारची धमकी अशाच नावाने आणि अशाच आशयाने यापूर्वी दिली गेली होती, हे तपासातून समोर आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here