पनवेल (प्रतिनिधी विनया मेढेकर) : पनवेल महानगरपालीका लसीकरण जास्ती जास्त लोकाना लाभ मिळावा म्हणून वेगवेगळ्या उपाय योजना आखत आहे त्यातच पनवेल महानगरपालिका अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कळंबोली कार्यक्षेत्रात अंथरूणाला खिळून असणाऱ्या तीन नागरिकांचे नुकतेच घरी जाऊन कोविड लसीकरण करण्यात आले. अंथरूणाला खिळलेल्या किंवा बेडरिडन रूग्णांचे लसीकरण पनवेल महानगरपालिकेने सुरू केले आहे. अशा रूग्णांच्या संबधितांनी लसीकरणासाठी नजिकच्या महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राशी समन्वय साधावा असे आवाहन आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी केले आहे.
अनेक कुटूंबामध्ये काही कारणाने अंथरूणावरती झोपून असलेले रूग्ण किंवा वयोवृध्द यांचे कोविड लसीकरण करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. अशा नागरिकांना रूग्णालयात किंवा लसीकरण केंद्रावरती जाऊन लसीकरण करणे शक्य नसते. या रूग्णांना,वयोवध्द नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानूसार बेडरिडन रूग्ण, वयोवृध्द नागरिकांना लसीकरण करण्यासाठी संबधितांनी जवळच्या नागरी आरोग्य केंद्राशी समन्वय साधून नोंदणी करावी. नागरी आरोग्य केंद्रातील विशेष पथकाच्या माध्यमातून बेडरिडन रूग्णांच्या घरी जाऊन त्यांचे लसीकरण केले जात आहे.
कोविड लसीकरणामध्ये समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्न करत आहे. लसींच्या उपलब्धतेनूसार बेडरिडन रूग्णांच्या संबधितांशी संपर्क साधून नागरी ओरोग्य केंद्रातील विशेष लसीकरण पथक लसीकरणाचे नियोजन करीत आहेत. नागरिकांनी आपल्या कुटूंबातील अंथरुणास खिळलेल्या रूग्ण किंवा वयोवृध्दांची नोंदणी नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रात करावी.






