अकरावी प्रवेशासाठीची सीईटी रद्द करण्याचा मुंबई हायकोर्टाचा आदेश

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी अत्यावश्यक म्हटली जाणारी सीईटी अर्थात प्रवेश परिक्षा रद्द करण्यासंदर्भात मुंबई हायकोर्टाने निकाल दिला आहे. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी सीईटी परिक्षा नियोजित होती. मात्र हायकोर्टाने सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतर ही प्रवेश परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई हायकोर्टात राज्यात अकरावी प्रवेशाबाबत सीईटी प्रवेश परीक्षा घेण्यासंदर्भातील याचिकेवरील पुढील सुनावणी आज झाली. मुंबई हायकोर्टात राज्य सरकार तर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. तर, प्रवेश ११ वी प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. आता सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे हा निर्णय म्हणजे एक प्रकारे राज्य सरकारला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

तसेच, आता विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत मुल्यमापनानुसार इयत्ता दहावीत जे गुण मिळालेले आहेत, त्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश दिला जाणार आहे. याचबरोबर, सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. तसेच, करोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळेच न्यायालयाला याप्रकरणी हस्तक्षेप करावा लागला, असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here