आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना उपमुख्यमंत्र्यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई (प्रतिनिधी) : “आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी अध्यात्म, आयुर्वेद, योगोपचार, संगीतोपचारासारख्या पारंपरिक भारतीय उपचारपद्धतींचे पुनरुज्जीवन केले. आयुर्वेद, योगोपचारांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किर्ती, लोकप्रियता मिळवून दिली. आयुर्वेदाचे महत्वं घराघरात पोहचवले. स्वयंपाकघरातल्या वस्तूंचे आयुर्वेदिक गुण गृहिणींना समजावून सांगितले.
आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, सुदृढ, आनंदी समाज निर्माण करण्याचे फार मोठे काम त्यांनी केले. श्री. बालाजी तांबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातले ऋषीतुल्य व्यक्तिमत्वं हरपले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
https://www.facebook.com/AjitPawarSpeaks/posts/4245452225562535
आयुर्वेदाचार्य श्री. बालाजी तांबे यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भारताच्या पारंपरिक आयुर्वेदिक उपचारपद्धतीला आधुनिक स्वरुप देऊन समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. आयुर्वेदाचे महत्वं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हजारो लेख लिहिले. दूरचित्रवाहिनीवरुन संवाद साधला. आयुर्वेदातील गुणकारी औषधं त्यांचा उपयोग याचे ज्ञान देशविदेशात पोहचवले. सर्वसामान्य नागरिकांना समजावून सांगितले. आयुर्वेदाच्या समृद्ध परंपरेचा दस्तावेज तयार करण्याचे फार मोठे काम त्यांनी केले आहे. त्यांनी निर्माण केलेल्या दस्तावेजातून भारतीय आयुर्वेदाचं ज्ञान, महत्वं भावी पिढ्यांसाठी चिरंतन राहणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी श्री. बालाजी तांबे यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.






