केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांची घोषणा
नवी दिल्ली : दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला देशासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण म्हणून प्रत्येक भारतीय गर्वाने छाती फुगवून त्यांना वंदन करतो. मोठ्या अभिमानाने राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजाला सलामी करतो. याच पार्श्वभूमीवर यंदा केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रगीताचे व्हिडिओ प्रदर्शन लाल किल्ल्यावर आयोजित केले आहे. सरकारने राष्ट्रगीताचा विशेष कार्यक्रम देशातील लोकांसमोर मांडला आहे. तशी घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी केली आहे.
यंदाच्या १५ ऑगस्टला प्रत्येक भारतीयांच्या नसानसात राष्ट्रगीत भिनणार आहे. कारण, अख्खा देश एकच वेळी राष्ट्रगीत म्हणणार आहे. भारत सरकारकडून यासाठी एक विशेष पोर्टल सुरु करण्यात आले आहे. ज्या पोर्टलवर तुम्ही गायलेले राष्ट्रगीत अपलोड करावे लागेल. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर या सर्व राष्ट्रगीतांचे सामुहिक प्रसारण केले जाणार आहे. यासाठी http://rashtragaan.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे.
या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला राष्ट्रगीत गाण्याचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, राज्य आणि वय टाकावं लागेल. यानंतर या वेबसाईटवरच राष्ट्रगीत सुरु होईल. मोबाईलवर या राष्ट्रगीताचा व्हिडीओ शूट करुन, तो व्हिडीओ तुम्हाला अपलोड करावा लागेल. देशाच्या तिरंग्यापुढे जात, पात, धर्म काही नाही, आपण सगळे भारतीय एक आहोत, हे दाखवण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आल्याचे केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितले.
गेल्या २ वर्षात कोरोनामुळे अख्खा देश लॉकडाऊनमध्ये होता..अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. अशा परिस्थितीतही प्रत्येक भारतीयाने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात भाग घ्यावा असा सरकारचा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम सुरु केला आहे. २०२३ पर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे. राष्ट्रगीताचा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर सरकारकडून नागरिकांना प्रमाणपत्रही दिले जाणार असल्याची सांगितले जात आहे.
भारत सरकारच्या या स्तुत्य उपक्रमात आपला सहभाग नोंदविण्यासाठी म्हणजेच http://rashtragaan.in या वेबसाईटवर आपला व्हिडीओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला पुढील पद्धती फॉलो कराव्या लागतील. वेबसाईटवर गेल्यावर तुम्ही तुम्हाला हवी ती भाषा निवडू शकता. त्यानंतर पुढे जाण्यासाठी प्रोसिड किंवा पुढे जा बटनावर क्लिक करा. नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला तुमचे नाव, वयोगट, देश आणि राज्य निवडायचे आहे. यानंतर परत प्रोसिड म्हणायचे, पुढच्या पेजवर तुम्हाला राष्ट्रगीताचा पर्याय दिसेल. राष्ट्रगीत प्ले करुन राष्ट्रगीत म्हणू शकता. हा राष्ट्रगीत म्हटल्याचा व्हिडीओ तुम्हाला याच साईटवर अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला भारत सरकारकडून याबाबतचे एक प्रमाणपत्र दिले जाईल.






