मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा प्रस्ताव; तज्ज्ञांच्या माध्यमातून सखोल अभ्यास करून लवकरच अंतिम धोरण निश्चित केले जाणार
मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजन उपलब्धतेचा विचार करून साधारणपणे ३० हजार रुग्णसंख्या झाल्यास करोना आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ कडक टाळेबंदी जाहीर केली पाहिजे, अशी सुस्पष्ट भूमिका राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मांडली आहे. याबाबत तज्ज्ञांच्या माध्यमातून सखोल अभ्यास करून लवकरच अंतिम धोरण निश्चित केले जाणार असल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने राज्य कृती दलाचे डॉक्टर, आयसीएमआरचे तज्ज्ञ तसेच मुख्य सचिव सिताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास आदींची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत लोकल प्रवासाला परवानगी, हॉटेलची वेळ याशिवाय प्रमुख चर्चा झाली ती तिसऱ्या लाटेचा सामना करताना वैद्यकीय अंगाने कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याची. यावेळी आयसीएमआरच्या अभ्यासगटातील मुकेश मेहता यांनी राज्याची आरोग्य व्यवस्था व करोना उपचारातील त्रुटींवर नेमके बोट ठेवले. तसेच तिसरी लाट अडविण्यासाठी करायच्या उपाययोजनांवर मेहता, डॉ शशांक जोशी, डॉ संजय ओक आदींनी आपली भूमिका मांडली.






